CCE: An overview
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - एक दृष्टीक्षेप मित्रांनो, ज्ञानाचे स्वरूप हे एकवर्णी नाही. व हे ज्ञान मिळविण्याचा मार्गही केवळ एक आणि एकच नाही. ज्ञान हे विविधांगी आहे. ते प्राप्त करण्याचे मार्गही भिन्न आहेत. काही ज्ञान हे गंधरूप असते, काही स्पर्शातून मिळते, काही श्रवणातून मिळते, काही दृश्य स्वरुपात आहे, काही रस स्वरुपात आहे. ज्या स्वरूपातील ज्ञान आहे, त्यानुसार पंचज्ञानेन्द्रीयांपैकी योग्य इंद्रियामार्फत ते प्राप्त होत असते. आकलनामध्ये प्रत्येकाची रुची, गती, पद्धती हे महत्वाचे घटक भूमिका बजावत असतात. ज्या प्रमाणे ज्ञानाच्या स्वरूपामध्ये भिन्नता आढळून येते, त्याप्रमाणेच ज्ञानप्राप्तीमध्ये व्यक्तीभिन्नता आढळून येते. ईश्वराची प्रत्येक निर्मिती ही एकमेव अद्वितीय आहे. काहींना केवळ ऐकून समजते. काहींना पाहिल्यानंतर चांगले समजते. काहींना चित्रपटांच्या माध्यमातून आकलन होते. तर काहींना प्रत्यक्ष अनुभवातून चांगले समजते. विविधांगी ज्ञानप्राप्तीसाठी विविध मार्गांचा अवलंब करण...