CCE: An overview
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - एक दृष्टीक्षेप
मित्रांनो, ज्ञानाचे स्वरूप हे एकवर्णी नाही. व हे ज्ञान मिळविण्याचा मार्गही केवळ एक आणि एकच नाही. ज्ञान हे विविधांगी आहे. ते प्राप्त करण्याचे मार्गही भिन्न आहेत. काही ज्ञान हे गंधरूप असते, काही स्पर्शातून मिळते, काही श्रवणातून मिळते, काही दृश्य स्वरुपात आहे, काही रस स्वरुपात आहे. ज्या स्वरूपातील ज्ञान आहे, त्यानुसार पंचज्ञानेन्द्रीयांपैकी योग्य इंद्रियामार्फत ते प्राप्त होत असते.
आकलनामध्ये प्रत्येकाची रुची, गती, पद्धती हे महत्वाचे घटक भूमिका बजावत असतात. ज्या प्रमाणे ज्ञानाच्या स्वरूपामध्ये भिन्नता आढळून येते, त्याप्रमाणेच ज्ञानप्राप्तीमध्ये व्यक्तीभिन्नता आढळून येते. ईश्वराची प्रत्येक निर्मिती ही एकमेव अद्वितीय आहे. काहींना केवळ ऐकून समजते. काहींना पाहिल्यानंतर चांगले समजते. काहींना चित्रपटांच्या माध्यमातून आकलन होते. तर काहींना प्रत्यक्ष अनुभवातून चांगले समजते. विविधांगी ज्ञानप्राप्तीसाठी विविध मार्गांचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते. उदा. कौशल्ये ही सरावाने आत्मसात होतात. आकलन हे कार्य-कारण भाव लक्षात आल्यावर होते. ज्ञान हे पुनरावृत्तीने प्राप्त होते. वाणी ही उच्चाराने शुद्ध होते. कर्ण हे श्रवणाने प्रशिक्षित होतात. रसास्वादासाठी अभिरुची आवश्यक असते (अभिरुचीतून रसास्वाद घेता येतो).
रोजच्या वर्गक्रियांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांचेमध्ये अनेक प्रकारची देवाण-घेवाण होत असते. प्रत्येक क्षणी ही प्रक्रिया द्विमार्गी चाललेली असते. शिक्षक बोलत असतांना विद्यार्थी करीत असलेले श्रवण, त्याला त्याने चेह-यावरील हावभावांनी दिलेला प्रतिसाद (मान डोलावणे, चेह-यावरील प्रश्नचिन्ह, काहीतरी सांगण्याची उत्सुकता, खंडणाची भूमिका, चेह-यावरील समाधान, इ.), शिक्षकांनी ह्या प्रतिक्रियांची घेतलेली दखल, प्रतिक्रियांनुसार योजनेत केलेले बदल, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांमुळे शिक्षकाला लाभलेले समाधान किंवा निर्माण झालेली अस्वस्थता, इ. ह्या सर्व प्रक्रिया दैनंदिन वर्गक्रियांचा अविभाज्य घटक असतात. ह्या सर्व प्रक्रिया चालू असतांना सातत्याने आदान-प्रदान, मूल्यमापन प्रक्रिया चालू असतात. फक्त त्यांचे मापन औपचारिकपणे होत नसते. मूल्यमापन हे दैनंदिन वर्गक्रिया व आंतरक्रिया यांचे अविभाज्य अंग आहे.
अभिरुचीतील व्यक्तीभिन्नतेमुळे विकासाचे क्षेत्र वेगवेगळे असते. ज्या क्षेत्रात अभिरुची अधिक त्या क्षेत्रातील विकास अधिक गतीने व अत्युच्च होतो. कुठल्याही एखाद्या क्षेत्रातील विकासासाठी काही विशिष्ट क्षमता व कौशल्यांचा समुच्चय आवश्यक असतो. अभिरुचीनुसार त्या त्या क्षेत्रातील आवश्यक क्षमता व कौशल्यांचा विकास झपाट्याने होतो. काही क्षमता व कौशल्ये ही विविध क्षेत्रांत सामायिक घटक असतात. अभिरुचीमुळे विकसित झालेल्या एखाद्या क्षेत्रातील क्षमता व कौशल्ये ही इतर क्षेत्रातील विकसनासाठी पूरक ठरतात व त्याचा वापर करून बालकांची इतर क्षेत्रे विकसित करणे सुलभ होते. त्यासाठी आवश्यकता असते ती विकसित झालेली कौशल्ये व क्षमता जाणण्याची. वर्गातील दैनंदिन क्रिया-आंतरक्रीयांच्या माध्यमातून त्या लक्षात येतात. हेच झाले दैनंदिन अनौपचारिक व सातत्यपूर्ण मूल्यमापन. सर्वच विद्यार्थ्यांची विकसित कौशल्ये व क्षमता लक्षात ठेवणे कठीण. त्यामुळे जाणीव झालेल्या क्षमता व कौशल्ये यांच्या नोंदी घेणे श्रेयस्कर ठरते.
शिकवावयाच्या आशयाच्या विश्लेषणातून तो आशय आत्मसात करण्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये यांची जाणीव निर्माण होते. आपण जाणलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्ये यांवरून तो आशय कोणाला सोपा जाईल व कोणासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील हे समजणे कठीण नसावे. त्यामुळे सुलभ अध्ययनासाठी तसेच विविधांगी अध्ययन अनुभव देण्यासाठी योग्य गटांची निर्मिती करणे (वर्गव्यवस्थापन करणे) सोपे होईल. प्रत्येक गटाला द्यावयाच्या अध्ययन अनुभवांचे स्वरूप भिन्न असेल. त्याचे नियोजन करणे हे आशय विश्लेषणामुळे सोपे होईल. त्यामुळे अध्यापनाचे नियोजन करतांना आशय विश्लेषण, विद्यार्थ्यांच्या क्षमतांची जाणीव, नोंदी व थोडेसे विमर्षण हे निश्चितच अधिक प्रदाने (फलित) देण्यासाठी मदत करतील यात शंका नाही.
आशय विश्लेषणातून ज्ञानाचे स्वरूप लक्षात येते. ज्ञानाचे स्वरूप लक्षात आल्यावर ते कसे संक्रमित करावयाचे हे देखील दृष्टीक्षेपात येते. त्यासाठी कोणत्या साधन-तंत्राचा वापर करावा लागेल हे कळून येते. त्या साधन-तंत्राचा वापर करून अध्ययन अनुभूती दिल्यास आकलन सुलभ होते.
प्रत्येकानेच सचिन तेंडूलकर व्हावे, प्रत्येकानेच एम.एफ.हुसैन व्हावे, प्रत्येकानेच अमिताभ बच्चन बनावे, प्रत्येकानेच सी.व्ही.रमण व्हावे, प्रत्येकानेच लतादीदी व्हावे हा अट्टाहास चुकीचा आहे. सचिन तेंडूलकर हा एम.एफ.हुसैन होऊ शकत नाही की एम.एफ.हुसैन हे सचिन तेंडूलकर होऊ शकत नाहीत. वरील प्रत्येक दिग्गजाच्या क्षमता भिन्न दिशेने विकसित झालेल्या आहेत. प्रत्येकाची अभिरुची, कल भिन्न आहे. त्यांना त्यांच्या अभिरुचीच्या क्षेत्रात विकासाची संधी, पोषक वातावरण मिळाले व त्यांनी त्या-त्या क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले. यासाठी प्रत्येक बालकाची अभिरुची, कल, क्षमता, कौशल्ये जाणून घेणे व त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे व विकासास संधी, पोषक वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे. हे झाले सर्वांगीण मूल्यमापन. ह्या सर्वांगीण मूल्यमापनाच्या नोंदी बलाकासोबत त्याच्या प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचल्यास शिक्षकांना त्यांचा विद्यार्थी समजून घेणे सोपे होईल. सचिनमधील कौशल्ये आचरेकर गुरुजींनी जाणले व भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज घडला.
डॉ.उज्ज्वल जनार्दन करवंदे,
वरिष्ठ अधिव्याख्याता
(९०२१२३६०८०)
ujjwal.karawande11@gov.in
(टीप: सदर मनोगत यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातूनही प्रकाशित केले आहे.)
Comments
Post a Comment