Use of ICT: The need of the hour

 माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कास धरणे: काळाची गरज

            आज तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व प्रसार झपाट्याने होत आहे. हे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये तर कल्पनातीत प्रगती झाली आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व त्याचे साधन असलेल्या संगणकाने तर आज मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. मग शिक्षण क्षेत्र तरी या प्रभावापासून कसे दूर राहू शकेल. आज तंत्रज्ञान आपल्या नखाच्या टोकावर येऊन पोहोचले आहे. या तंत्र-ज्ञानापासून आजचा विद्यार्थी तरी कसा दूर राहू शकेल. उलटपक्षी आजचा विद्यार्थीवर्ग हा तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ आलेला आहे. तंत्रज्ञानाच्या वापराबाबतीत तरी आजचा विद्यार्थी हा शिक्षकाला मागे टाकून पुढे गेल्याचे अनुभवास येत आहे. आजच्या विद्यार्थ्यांसमोर व्हर्च्युअल लर्नींग, संगणक, आंतरजाल यांसारखे अधिक प्रभावी पर्याय व विविध ज्ञानस्रोत सहज उपलब्ध आहेत व ते त्याच्या आवाक्यामध्ये आहेत. ज्ञानाचे विस्तीर्ण दालन भ्रमणध्वनीसारख्या सर्वत्र उपलब्ध व सहज वापरता येण्याजोग्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांसाठी सहज उघडे झाले आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व साधने आज शिक्षकांना एक प्रभावी पर्याय व आव्हान बनू पाहात आहे. त्यामुळे आजच्या शिक्षकाला तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.
            संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाच्या (Total Quality Management) परिभाषेत विद्यार्थ्याला आज ग्राहक म्हटले गेले आहे. साहजीकच हा ग्राहक ज्याठिकाणी योग्य दरात चांगल्या प्रतीची सेवा मिळणार आहे त्याकडे वळणार आहे. त्यामुळे सेवा प्रदान करणाऱ्यांमध्ये ग्राहक मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. आजच्या शिक्षकाला कालबाह्य व्हायचे नसेल तर त्याला त्याच्या समोरील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आव्हानाला सामोरे जाऊन आधुनिकतेची कास धरावी लागेल व ह्या आव्हानाचे रूपांतर स्वत:च्या फायद्यामध्ये करून घ्यावे लागेल. त्यासाठी आजच्या शिक्षकाला तंत्रज्ञानाचा मित्र व वापरकर्ता (Techno-savvy & Techno-friendly) व्हावे लागेल.
            आज शिक्षणक्षेत्रात संप्रेषण प्रक्रियेमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. खडू फळ्याची जागा डीजीटल बोर्डाने घेतली आहे. क्लासरूम्स हे व्हर्च्युअल लर्नींंग सेंटर्स होत आहेत. पारंपारिक पद्धतीने शिकविणाऱ्या शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांना संगणकाधारित अध्ययन अधिक आकर्षित करीत आहे. संगणकाच्या आधारे विद्यार्थ्यांचे अध्ययन सुकर, सुगम व चिरकाल टिकणारे होत आहे. अशा परिस्थितीत अध्यापकांनी स्वत:ची पारंपारिक अध्यापन पद्धती बदलून तंत्रज्ञानाचा स्वीकार न केल्यास ते व त्यांची अध्यापन तंत्रे उद्या कालबाह्य होणार आहेत.

डॉ.उज्ज्वल जनार्दन करवंदे,
वरिष्ठ अधिव्याख्याता
(९०२१२३६०८०)
ujjwal.karawande11@gov.in

(टीप: सदर मनोगत यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातूनही प्रकाशित केले आहे.)

Comments

Popular posts from this blog

The First Blog Post

Vocabulary Building

Teachers Day - A Reflection