Reflection on 'Teachers Day'

 शिक्षक दिनाच्या निमित्ताने .  . .


गुरु: ब्रह्मा, गुरु: विष्णू, गुरु: देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म:, तस्मै श्री गुरवे नम: ।।


नमस्कार मित्रांनो,

            आपणासोबत संवाद साधण्यासाठी सक्षम बनविणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करून आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधत आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच गुरु-शिष्याची एक समृद्ध परंपरा चालत आली आहे. काळपरत्वे गुरुचे स्वरूप बदलत गेले. अध्यापन पद्धती बदलत गेल्या. पूर्वी गुरु शिष्याचे नाते अगदी घनिष्ठ (गुरुगृहीच शिष्याचा वास असल्यामुळे) होते. ज्ञानाचे संक्रमण हे मौखिक पद्धतीने गुरुकडून शिष्याकडे होत असे. पाठांतर व शास्त्रार्थावर भर असायचा. अगदी प्राचीन काळी सर्व ज्ञान-विज्ञान हे वेदांमध्ये एकवटले होते. श्लोकांच्या स्वरूपातील हे अगाध ज्ञान गुरूंकडून शिष्यांकडे मौखिक पद्धतीने संक्रमित होत असे. त्यामुळे ज्ञानार्जनासाठी गुरुशिवाय पर्याय नव्हता. गुरु हा ज्ञानार्जनाचा एकमेव स्रोत होता. संस्कृत भाषा व वर्ण व्यवस्था यांमुळे ज्ञान, विज्ञान व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकले नव्हते. 

            मुद्रण कलेच्या विकासाबरोबर मौखिक स्वरूपातील ज्ञान-विज्ञान हे ग्रंथांमध्ये परावर्तीत होऊ लागले. त्यामुळे मौखिक पद्धतीच्या शिक्षण पद्धतीला वाचन-चिंतन-मनन असे नवे स्वरूप प्राप्त झाले. गुरुंबरोबरच ग्रंथ हे देखील ज्ञानदान व ज्ञानप्रसाराचे महत्वाचे काम करू लागले. ज्ञानाचा प्राथमिक स्रोत जरी लेखक असले तरी मुद्रित साहित्याचा अर्थ लावण्याचे महत्वाचे कार्य अद्यापही गुरूंच्या (शिक्षकांच्या) मदतीने होणे गरजेचे व अनिवार्य होते. वायगॉट्स्की यांच्या 'झोन ऑफ प्रॉक्झिमल डेवलपमेंट' ची संकल्पना मार्गदर्शकाचे महत्त्व अधोरेखित करते. स्वयंअध्ययनाने होणारा विकास आणि विकासाची परिसीमा यामधील अंतर (अर्थात 'झोन ऑफ प्रॉक्झिमल डेवलपमेंट') भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य एक मार्गदर्शकच करीत असतो. 

            मुद्रित व संग्रहित ज्ञानाच्या स्वरूपामुळे दूरस्थ शिक्षणदेखील शक्य होऊ लागले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे निर्माण झालेले ध्वनीमुद्रण व ध्वनीचित्रमुद्रण यामुळे अध्ययन-अध्यापन व शिक्षणपद्धतीला एक नवीन आयाम प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्वयंअध्ययनाला बऱ्यापैकी मदत होऊ लागली. तरीदेखील दूरस्थ शिक्षणप्रणाली मध्येही विद्यार्थ्यांच्या शंका-समाधानासाठी संपर्क सत्रांची योजना असतेच. दूरस्थ शिक्षण प्रणाली ज्या पूर्वअटींवर बेतलेली आहे त्यांमध्ये अंत:प्रेरणा अथवा बाह्यप्रेरणा, आकलनासह वाचन, लेखन कौशल्य तसेच गणनक्षमता अवगत असणे यांचा समावेश होतो. शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर आकलनासह वाचन, लेखन कौशल्य तसेच गणनक्षमता विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य एक शिक्षकच करीत असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येदेखील ह्या मुलभूत क्षमता व कौशल्य विकसनावर भर दिलेला दिसून येतो. 'पायाभूत साक्षरता व अंकज्ञान' ह्या शीर्षाखाली त्यांचा स्वतंत्र व सर्वप्रथम विचार झालेला दिसून येतो. २०२६-२७ पर्यंत साध्य करावयाचे ते सर्वप्रथम उद्दिष्ट आहे.

            अमूर्त संकल्पना मूर्त रुपात आणण्याचे महत्त्वाचे कार्य एक शिक्षकच कुशलतेने व उत्कृष्टपणे करू शकतो हे कुमठे बीटमधील शैक्षणिक प्रयोगाने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे एका बाजूला ग्रंथ, मुद्रणे (ध्वनी, ध्वनीचित्र), शैक्षणिक साधने हे सर्व जरी उपलब्ध व महत्त्वाचे असले तरी दुसरीकडे शिक्षकांचे महत्त्वदेखील तितकेच आहे. ह्या दोन्ही बाबी एकमेकास पर्याय नसून परस्परपूरक आहेत. काळाच्या ओघात नवनवीन अध्यापनतंत्रे आत्मसात करणे हे शिक्षकांसमोरील आव्हान ठरू शकते, परंतु हिच तंत्रे त्यांचेसाठी एक वरदान देखील ठरतात. एखादे चलचित्र दाखवीत असतांना ते मध्येच थांबवून विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक प्रश्न विचारण्याचे काम हे शिक्षकांचेच. विचाराशिवाय चलचित्र पाहणे म्हणजे केवळ मनोरंजन ठरेल, अध्ययन नव्हे. 'विचार' हे अध्ययनाचे मूळ आहे. विद्यार्थ्यांना विचार करावयास प्रवृत्त करण्याचे कसब एका शिक्षकाचेच.

            माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा प्रस्फोट झाला आहे. ज्ञानाच्या स्रोतामध्ये आंतरजाल (अर्थात इंटरनेट) हे एक महत्त्वाचे व अतिशय शक्तिशाली माहितीस्रोत व ज्ञानस्रोत बनले आहे. परंतु, शक्तीचा वापर देखील तितकाच काळजीने व संवेदनशीलपणे करणे गरजेचे आहे हे 'डायनामाईटचा शोध व अणुबॉम्ब बनविण्यातील डायनामाईटचा वापर' या उदाहरणातून अधोरेखित होते. माहितीच्या जंजाळात हरवून न जाता योग्य ती माहिती शोधणे व मिळविणे ही नवीन भूमिका माहिती तंत्रज्ञान युगातील शिक्षकाला पार पाडावी लागते. तरच ह्या शक्तिशाली स्त्रोताचा सुयोग्य वापर शक्य आहे.

            आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात गुरु हायटेक झाले आहेत. सध्याच्या महामारीच्या काळात गुरु-शिष्यांमध्ये निर्माण झालेली भिंत पाडण्याचे काम शिक्षक नवनवीन तंत्रांचा व तंत्रज्ञानाचा वापर शिताफीने करून करीत आहेत. एके काळी केवळ राजकीय व प्रशासकीय कारणास्तव वापरली जाणारी दूरदृश्यसंवाद प्रणाली आज आपले शिक्षक बंधू-भगिनी शाळेपर्यंत येणे शक्य नसलेल्या मुलांसाठी अगदी लीलया वापरत आहेत. आजच्या जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी विविध शैक्षणिक, तांत्रिक व तंत्रज्ञानात्मक प्रयोग जरी होत असले तरी भारतासारख्या विकसनशील देशातील अंकीय साधने (डीजीटल डिव्हाइसेस) उपलब्धतेतील दरी दुर्लक्षून चालणार नाही. जगभरातील विविध विकसित, विकसनशील व अविकसित देश कमी-अधिक प्रमाणात कोरोना महामारीमुळे शैक्षणिक दृष्ट्यादेखील प्रभावित झाले आहेत हे जागतिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून लक्षात येते.

            शिक्षण हे मानवाने मानवासाठी व मानवतेसाठी चालविलेले उदात्त कार्य आहे. ते मानवी व मानवतावादी स्पर्शाशिवाय कसे होऊ शकेल? म्हणूनच कि काय एरव्ही सुट्ट्यांसाठी आसुसलेले चिमुकलेदेखील आज शाळा केव्हा सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तेच नव्हे तर शिक्षक व पालक देखील शाळा सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. आशा करूया, कि ही परिस्थिती लवकरच बदलेल व शाळा पूर्ववत सुरु होतील आणि शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट सुरु होईल. आजच्या जागतिक महामारीच्या काळात शिक्षक करीत असलेल्या शिक्षणाच्या उदात्त कार्यास मानाचा मुजरा व सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

उज्ज्वल जनार्दन करवंदे,
वरिष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
पदमपुरा, औरंगाबाद.

भ्रमणध्वनी क्र.: ९०२१२३६०८०
ई-मेल: ujjwal.karawande11@gov.in


Comments

  1. शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गुरूचे महत्त्व सार्वकालिक असते, हे अधोरेखीत करणारा लेख आवडला.

    ReplyDelete
  2. शिक्षकांचे कार्य खरोखरच महान आहे आणि आता महामारी मध्ये व महामारी नंतर चिमुकल्यांच्या साक्षरतेवर मोठा भर द्यावा लागणार आहे.शिक्षकांना मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  3. अंतर्मुख करणारा लेख धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. खूप छान विचारमंथन.

    ReplyDelete
  5. अभ्यासपूर्ण लेख..👌💐

    ReplyDelete
  6. खूपच छान विवेचन आदरणीय सरजी ! आपल्यालाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
    खरच पूर्वी आणि आत्ता ही ह्या डिजिटल युगातही शिक्षकाचे महत्व तसूभरही कमी झाले नाही. किंबहुना अधिकाधिक पटत आहे. आपण नोंदवलेली बाब अत्यंत महत्वाची आहे.आजही आपल्या देशात अंकीय साधनांची अननुपलबद्धता तसेच शिक्षकांना बदलत्या काळानुसार वापरता येतील अशी साधने यांची उपलब्धता यातील दरी नक्कीच दूर झाली पाहिजे.

    ReplyDelete
  7. शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा साहेब

    ReplyDelete
  8. शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

    ReplyDelete
  9. गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेत गुरूकडून असलेल्या भविष्यकालिन अपेक्षा व्यक्त करणारा हा लेख आहे

    शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा🌹🌹

    ReplyDelete
  10. खूपच सुंदर साहेब

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. खुपचं छान लेखन सरजी

    ReplyDelete
  13. वस्तुस्थिती दर्शवणारा सुंदर लेख. शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा सर 🙏🙏🙏

    ReplyDelete
  14. अप्रतिम विचारमंथन!
    शिक्षण-प्रणालीचा कालौघात झालेला विकास आणि अनुषंगाने शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे बदलते स्वरूप याचे विवेचन करणारे सुरेख शब्दांकन!
    सर, आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शिक्षक-दिन प्रसंगी आपल्या सारख्या अभ्यासू, तत्वनिष्ठ, ध्येयाप्रेरित शिक्षकाला अभिवादन! ��
    ������

    ReplyDelete
  15. अप्रतिम विचारमंथन!
    शिक्षण-प्रणालीचा कालौघात झालेला विकास आणि अनुषंगाने शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे बदलते स्वरूप याचे विवेचन करणारे सुरेख शब्दांकन!
    सर, आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शिक्षक-दिन प्रसंगी आपल्या सारख्या अभ्यासू, तत्वनिष्ठ, ध्येयाप्रेरित शिक्षकाला अभिवादन! 🙏
    💐💐💐

    ReplyDelete
  16. अप्रतिम ... आपले विचार मंथन वाचुन शेवटी डोळ्यात पाणी आले... अगदी पुरातन काळापासुन मौखीक पद्धतीने चालणारी ज्ञानाची वाटचाल सांगत सांगत शिक्षणाचे सार्वत्रिकरण न होण्याचे कारण आज तुमच्या मुळे स्पष्ट झाले... मुद्रित साहित्याचा अर्थ लावणारे गुरु हे विशेषण खुप विशेष वाटले.... दुरस्थ शिक्षण कसे सोपे झाले .. याचा उलगडा खुप छान स्पष्ट केले सरजी... आंतरजाल काय आणि कसे... अतिशय सोप्या शब्दात मांडणी केलीत सरजी... एकंदरीत
    शाळा -विद्यार्थी, शिक्षक- पालक यांची परिस्थिती मनाची व्यथा... वाचताना मन भरुन आले...
    "बालकांचा किलबिलाट" डोळ्यांनी शब्द पाहताच मनाने उच्चारताच मन गहीवरुन आले...
    अतिशय सुरेख आणि शेवटी मनाला स्पर्शुन जाणारा लेख आज वाचनात आला...
    खुपखुप धन्यवाद सरजी🙏🙏🙏

    ReplyDelete
  17. आपण सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे अधिक लिहिण्याची व लिहिते होण्याची प्रेरणा मिळाली.
    मनस्वी धन्यवाद.
    😀

    ReplyDelete
  18. खूप छान लेख Sir

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The First Blog Post

Vocabulary Building

Teachers Day - A Reflection