Teaching English to beginners: A talk
हितगुज: इंग्रजी भाषेचे अध्यापन
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील पालकांचा ओढा व वाढते आकर्षण लक्षात घेऊन डिसेंबर १९९९ च्या शेवटास महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. तो होता ‘इयत्ता पहिलीपासून हसत खेळत इंग्रजी शिकण्याचा’. जून २००० पासून बिगर-इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ह्या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली. अभ्यासक्रमाची व पाठ्यसाहित्याची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली की, मातृभाषा शिकता शिकता तिच्या मदतीने इंग्रजी भाषेचे अध्ययन व्हावे. ह्यासाठी भाषिक खेळ, बडबडगीते, गोष्टी, छोटे-छोटे संवाद यांची मदत घेतली जाते. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये श्रवण व भाषण सराव तसेच वाचन व लेखन पूर्वतयारी असे इंग्रजी अध्ययनाचे स्वरूप आहे.
अध्यापन देखील अगदी अनौपचारिक पद्धतीने करणे अपेक्षित आहे. मातृभाषेचा वापर करून मुलांशी सुसंवाद साधणे (establish rapport) व भाषिक कृतींच्या माध्यमातून भाषा आत्मसात करण्याच्या संधी व वातावरण तयार करणे एवढे साधे-सोपे स्वरूप अध्यापनाचे (सुलभिकरणाचे) आहे. सुलभकाची भुमिका अंगिकारणा-यांसाठी (शिक्षक/ पालक) तळटिपा/ शिक्षकांचे पान पुस्तकामध्येच (Course-book) देण्यात आले आहे. त्यानुसार अनुभवांची रचना केली तरी पुरेसे आहे.
मातृभाषेचा वापर पूर्णतः टाळून केवळ इंग्रजीमध्येच मुलांशी संभाषण साधणे अपेक्षितही नाही व न्याय्यही नाही. भाषिक कृती करण्यासाठी सूचना मातृभाषा व हावभावयुक्त इंग्रजीमधून द्यावयाच्या आहेत. काळजी फक्त एकच घ्यायची, ती म्हणजे, पाठ्यसाहित्याचे शब्दशः भाषांतर करायचे नाही.
मुलांकडून सुरुवातीला १००% अचूकता अपेक्षित नाहीच. १००% अस्खलितपणा (काही चुकांसह) असेल तर मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. सुरुवातीच्या टप्प्यावर मुलांना खजील न होऊ देता चुकांची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. ह्या टप्प्यावर प्रोत्साहन देण्याची तसेच प्रयत्नांची दखल घेऊन त्यांची पावती देणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एकदा विषयाची गोडी लागली की, ते विषयाचा अभ्यास करण्यास उत्सुक असतात असा अनुभव आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही अगदी अनौपचारिक वातावरणात करावयाचे आहे. लेखी परीक्षा न घेता, निरीक्षणातून प्राप्त वैशिट्ये दैनंदिनीमध्ये नोंदवून ठेवाव्यात.
डॉ.उज्ज्वल जनार्दन करवंदे,
वरिष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
पदमपुरा, औरंगाबाद.
(९०२१२३६०८०)
ujjwal.karawande11@gov.in
(टीप: सदर मनोगत यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातूनही प्रकाशित केले आहे.)
बडबडगीत, गाणे , छोटे संवाद नाटिका , role-playing,
ReplyDeleteकृती / पाककृती वर्णन इ भाषा शिक्षणाचे उत्तम माध्यम आहेत, यावर एक पुस्तिका पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन स्तरासाठी तयार करून तिची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. 2000 ते 2005 च्या My English Book आवृत्त्यांमधील बडबडगीते अत्यंत सुंदर चालीत रूढ झाली होती ती सर्व गाणी पुन्हा वापरात आणावित असे वाटते ,कारण त्यांच्या चाली व आवश्यक हावभाव Actions चांगलीच परिचित झालेली आहेत
खूपच छान सर, नेहमीप्रमाणे छान मार्गदर्शन 🙏🏻
ReplyDelete